व्यक्तीचा जीवनोद्देश आणि समाजाभिमुखता
तो कुमार आपल्या कुटीकडे धावत आला. त्याने ताटी घट्ट बंद केली आणि जगाकडे पाठ फिरवून बसला.पाठीमागे त्याची बहीण धावत येत होती. एका माणसाने रस्त्यावरची माती उचलून भिक्षेच्या झोळीत घातली होती हे तिने पाहिले होते.भिक्षेचे सगळे पीठ मातीमोल झाले! हा अपमान सहन न होऊन तिचा मोठा भाऊ उद्विग्न होऊन कुटी बंद करून बसला. तिने दारावर थापा मारल्या. ताटीच्या फटी मधून पाहिले तर आत पाठ फिरवून थोरला भाऊ बसला होता. ती म्हणाली,” दादा हे जग आणि आपण का वेगळे आहोत? तूच तर एकतेच्या गोष्टी सांगतोस ना! मग तू चिडलास तर कसे होईल?सारे जग जेव्हा वन्ही होते तेव्हा आपण पाणी व्हायला नको का?”
मुक्ताई वेगवेगळे दाखले देऊ लागली.
जीभ दातांनी चावली।
कोणे बत्तीशी तोडली।
मन मारुनी उन्मन करा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
आणि या शब्दांचा,त्या आर्त हाकेचा परिणाम झाला, भरलेल्या डोळ्यांनी ज्ञानदेवाने ताटी उघडली आणि तो समाजाभिमुख झाला.सर्वांची माऊली झाला.सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरीची गंगा त्याने प्रवाहित केली.
याच भागवत मार्गातील तुकोबाराय म्हणतात,’बुडती हे जन देखवेना डोळा येतो कळवळा म्हणवूनि.’मला मार्ग माहीत आहे, आणि लोकांचे दुःख दिसत आहे,अशावेळी मी त्यांना बुडू देऊ शकत नाही,अशी तुकाराम महाराजांची भावना.ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती!
अलीकडच्या काळातील असे समाजाभिमुखतेचे अद्वितीय उदाहरण म्हणजे वैराग्याचा पुतळा असलेले स्वामी विवेकानंद!एकाच वेळी एकांतात आणि लोकांतात रहाण्याची किमया त्यांना साधली होती.सुरुवातीला ते जेव्हा भाव समाधीत,आत्मानंदात वारंवार जाऊ लागले,तेव्हा गुरू रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितले की,”नरेन, तुला एकट्याने का हा आनंद उपभोगायचा आहे?आधी कालिमातेचा हा प्रसाद सर्वांना वाट,आणि मग तू खा.” या उपदेशाचा महिमा असा की स्वामीजींनी संपूर्ण आयुष्य मठ आणि मिशनच्या कामासाठी वाहिले.
विवेकानंदांना सर्वांच्या मुखात दोन घास जावेत ही तळमळ लागलेली होती. आपल्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी सेवाकार्य उभी केली. अन्नछत्रे उघडली. “दीयतां नियतां भुज्यताम्” असा घोष अन्नछत्रात व्हावा. भातावरचा फेस गंगेपर्यंत वाहत जाऊन गंगाजळ पांढरेधोप व्हावे.असे झालेले पाहिले की माझे डोळे निवतील.”असे ते म्हणत असत.
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींना शिकवणे सुरू केले, त्यावेळी शाळेत जातांना सावित्रीबाईंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.त्यांच्या अंगावर चिखल, शेण टाकण्याचा प्रकारही काही दिवस चालला.सावित्रीबाईंनी एक लुगडे शाळेत नेऊन ठेवले होते.खराब झालेले लुगडे बदलून त्या शाळेत शिकवायच्या.
तेथून निघतांना खराब पातळ धुवून शाळेतच वाळत घालायच्या.पण त्यांनी आपल्या जीवनोद्देशाशी फारकत घेतली नाही.लहान मुलाला कडू औषध प्यायचे नसले की ते हातपाय झाडते,पण आई ते औषध त्याला पाजतेच,तसेच काहीसे अज्ञ समाजाबाबतीत समाजसुधारकांना करावे लागते.फुले दाम्पत्याने आईच्या मायेने समाजाला सांभाळून घेतले आणि आपले कार्य केले!ही झाली लोकोत्तर महापुरुषांची,महान स्त्रियांची उदाहरणे!
परंतु अगदी आपल्यामधील वाटणाऱ्या थोरांची जीवने कशी घडतात हे आपण पहात असतो.एखादे एकनाथजी रानडे विवेकानंद शिला स्मारकाचा ध्यास घेतात,पायाला चक्रे लावून फिरतात आणि एक भव्य प्रकल्प उभा राहतो. एखादे विनोबा भावे सोबत येतील त्यांना घेऊन पदयात्रा करतात आणि भूदानात जमीनदारापासून अल्पभूधारकापर्यंत सगळे आपल्या जमिनी दान देतात,यज्ञात सहभागी होतात. कुणी चित्तरंजन दास आपला राजवाड्यासारखा बंगला देशकार्यास अर्पण करतो,चालणारी वकिली सोडून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतो आणि जनता त्याला देशबंधु हा प्रेमाचा ‘किताब देते. कुणी मुरलीधर आमटे एका महारोग्याला तळमळत पडलेला बघतो आणि त्याला आपला जीवनोद्देश मिळतो,तो सर्वांचा बाबा आमटे होऊन जातो.एखादा साधा तरुण प्रचारक संघव्यवस्थेतून जनसंघात पाठवला जातो आणि राजकारणाच्या दलदलीत तो ‘एकात्म मानववादाचे’ कमळ फुलवतो,दीनदयाळ हे नाव सार्थ करतो.राजा राम मोहन रॉय आपल्याच भावजयीला सती जातांना बघतात,त्या दुःखाचा परिणाम असा घडतो की ते आपले सगळे आयुष्य स्त्री स्वातंत्र्य व समाजसुधारणेसाठी वेचतात.
डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्यासारखे डॉक्टर, भारतात येऊ घातलेली हृदयविकार, मधुमेहाची लाट थोपवण्यासाठी सलग व्याख्याने देतात,मदतनीसांचे जाळे उभारतात.त्यांना जेव्हा स्वतःला डॉ.जिचकारांनी सांगितलेल्या जीवनशैलीमुळे लाभ झाला तेव्हा ते म्हणतात की कुणीही स्थूल,पोट सुटलेला मनुष्य दिसला की मला वाटायचे त्याला सांगावे की माझ्याकडे तुझ्यासाठी काही आहे.ही जी भावना आहे ना,त्यालाच म्हणतात समाजाभिमुखता!जीवनाचा उद्देश जरी व्यक्तिगत पातळीवर विकसित झाला असला तरी त्याचा परिमळ सभोवती पसरतोच.
समाजातील अशी थोरामोठ्यांची जीवने सर्वसामान्य माणसाच्या समोर आदर्श उभा करीत असतात.
जीवनोद्देश समाजाभिमुख होण्यासाठी अत्यन्त आवश्यक असतो तो म्हणजे आत्मभाव!आपलेपणाची भावना.महात्माजींच्या आयुष्यात घडलेली एक छोटी घटना ते नेहमी सांगत असत. एकदा पहाटेच्या वेळी ते एका टेकडीवर फ़िरायला निघाले होते.एक लहान मुलगी तिच्या छोट्या भावाला कडेवर घेऊन टेकडी चढत होती.तिला धाप लागत होती,पण तरीही ती नेटाने त्याला घेऊन जात होती.टेकडीवर पोहोचल्यावर गांधीजींनी तिला विचारले की बाळ एवढा त्रास होतो तर भावाला का घेऊन आलीस?त्यावर ती मुलगी म्हणाली,”अहो,लहान भावाला आणण्याचा कुठे त्रास होतो का?बघा तो किती आनंदात आहे.”
महात्मा गांधी म्हणतात त्या मुलीचे बोलणे मला अंतर्मुख करून गेले.आपल्या बांधवांसाठी जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा ते जाणवत नाहीत,कारण त्यामागे निरपेक्ष प्रेम असते!असे प्रेम हा जीवनाचा स्थायीभाव आणि उद्देश असेल तर जीवन स्वाभाविकपणे त्यागमय होते.
अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील संसाराच्या रामरगाड्यात, मी कशासाठी जीवन जगत आहे,माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे हा प्रश्न पडतो.फक्त मन:पटलावर स्थिर होण्यापूर्वीच तो प्रश्न अनेकदा विरून जातो.मग कधीतरी इतिहासाचे एखादे सुवर्णपान समोर येते-“प्रतावरावांस महाराजांचे आज्ञापत्र सुटले-बहलोलखानास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हांस रायगडावर तोंड दाखवू नये!”आणि मग प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा साथीदार बेभानपणे बहलोलखानावावर हल्ला चढवतात.समुद्रासारख्या अफाट सैन्यावर सात तेजस्वी तारे तुटून पडतात!त्यांचे ते वीरमरण इतिहासात अमर होऊन जाते!
असे काही वाचले ऐकले की वाटून जाते,आपण कसे जगत आहोत?आपल्या जीवनात ‘राम कधी येईल?स्वत:च्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी मी काय करावे?असे प्रश्न पडतात ते भाग्यवान! त्यांना अर्जुनाचे निमित्त करून श्रीकृष्ण सांगतात,’स्वभावधर्मा नुसार ठरले, जे तव कर्तव्य.तेच करी,का कशास,ऐसें पुसणे नच योग्य.नियत कार्य कर समत्व मतीने, सोडूनि सारी माया ममता.’
या उपदेशानुसार समजा माणसांना स्वभावधर्म, आपले जीवनोद्देश किंवा साध्या शब्दांत आपली अभिरुची उमजली आहे. त्यानुसार आपली जिविका आणि उपजीविका ते सांभाळत आहेत. परंतु ते समाजाशी एकरूप नाहीत,किंबहुना जरा फटकूनच आहेत. केवळ आपल्यापुरतेच जगत आहेत.असे जगणे अर्थपूर्ण आहे का? की समाजाभिमुख होऊन जगणे अधिक अर्थपूर्ण आहे?याचा विचार आपल्याला या लेखात करायचा आहे.
जीवनोद्देश लाभलेल्या व्यक्तीचे जीवन दिव्याच्या प्रकाशाने खोली उजळून निघावी तसें आनंदाने उजळून निघते.या आनंदामुळे मनुष्याची आत्मिक शक्ती वृद्धिंगत होते.त्याला मानसिक स्वास्थ्य आणि अस्मितेची प्राप्ती होते.ते त्याने आपल्यापुरते जगले तर बिघडले कोठे? का म्हणून त्याने जगाची पर्वा करावी?
एका चित्रपटात गीत आहे,
दुनिया ने हमको दिया क्या
दुनिया सें हमने लिया क्या
हम सब की परवाह करे क्युं
सब ने हमारा किया क्या
चाहे जीएंगे मरेंगे
हम ना किसिंसे डरेंगे
हमको ना रोके जमाना
जो चाहेंगे हम करेंगे
अगदी योग्य वाटून जातात ही कवने!आम्ही मेहनतीने आमचे विश्व उभे केले आहे.ते आम्ही समरसून जगत आहोत.अहो आजच्या स्पर्धेच्या युगात दुसऱ्यांचा विचार करायला सवड आहे कुठे?ज्याने त्याने आपले पहावे.आम्ही कोणाच्या आध्यातमध्यात नाही, आमचा आनंद सुख उपभोगत आहोत तर त्याला कोणाची काय हरकत आहे?मग या विचाराच्या समर्थनार्थ चार्वाक , एपिक्युरस् यांची उदाहरणे दिली जातात.
वरवर पहाता हे अगदी बरोबर वाटते.पण माणूस म्हणून जन्माला आलो की आपल्यावर काही ऋणे असतात,असे आपली परंपरा सांगते.ती फेडण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे.नाहीतर जीवनात कितीही सौख्य असले,अर्थपूर्ण जीवनाची प्राप्ती झालेली असली, तरी त्यात उणेपणा रहातो,अस्वस्थता उरते!आज सगळी सुखे हात जोडून उभी असतांना मनोकायिक रोगांनी ग्रस्त समाजघटक आपण पहात आहोत!असे मनाला ग्रासून टाकणारे वैरी ही या अस्वस्थतेचीच फळे होत!आपण स्वतःला कितीही वेगळे मानले तरी आपण या सृष्टीचा,समाजाचा घटक आहोत,त्यांचे आपल्यावर ऋण आहे हे अंतर्मनाला माहिती असते.म्हणूनच आपल्या पूर्वजांनी पाच यज्ञकर्मे सांगितली आहेत,जी ऋण फेडण्यासाठी केली जातात.
व्यक्तिगत ऋणे पाच प्रकारची आहेत – पितृऋण, ऋषीऋण, देवऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण.ही व्यक्तिगत ऋणे फेडण्यासाठी पंचमहायज्ञ केले जातात -ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ , पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ.
ह्या पंचमहायज्ञांनी व्यक्तिगत जीवनोद्देश समाजाभिमुख होतो. स्वत:च्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण समाजाचे, सृष्टीचे देणे लागतो हे मनावर ठसते. अगदी साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास ,यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद जे ग्रहण करतात ते श्रेष्ठ लोक सर्व पापांपासून मुक्त असतात.म्हणजेच मी जेवतो तेव्हा कोणी उपाशी असेल तर मी पाप भक्षण करतो.अगदी आपल्या चातुर्मासाच्या कहाणीत देखील,हाकारे पिटारे करारे डांगोरा,नगरात कुणी उपाशी आहे का? असे सांगितले जाते. उपाशीपोटी कुणी झोपत असेल त्याचे पाप अधिक प्रमाणात धान्य ज्याच्याकडे आहे,त्याच्या माथी बसते.पुराणांनी सुद्धा पुण्य मिळवण्यासाठी,मनःशांती साठी आणि मृत्यूनंतरच्या उत्तम गतीसाठी समाजोपयोगी कामे करण्यास सांगितले आहेत.पुराणे म्हणतात विहिरी खणा, रस्त्याच्या दुर्तफा झाडे लावा,तळी बांधा,पाणपोया घाला,अन्नदान करा,अनाथ प्राण्यांची व्यवस्था लावा, तीर्थयात्रा करा, गोदान करा,धर्मशाळा बांधा.हे सगळे केल्याने दुसऱ्याला लाभ तर आहेच पण मुळात तुम्हांला मनःशांती मिळेल!
स्वामी विवेकानंद म्हणतात,” त्या ब्रह्माच्या एकोsहं बहु:स्याम चा हाच अर्थ आहे, शिवभावें जीवसेवा.
स्वामी विवेकानंदांचा चरित्रग्रंथ लिहिणारे डॉ. सत्येंद्रनाथ मुजुमदार म्हणतात,’ “रामकृष्ण संघाचे जे सारे साधू सेवाव्रताला मुक्तीचा एक मार्ग जाणून नरनारायणाच्या सेवेसाठी प्रथम पुढे झाले होते,त्यांना परम कल्याणासाठी आत्मसमर्पण करण्याची दिव्य प्रेरणा स्वामीजींच्या रोजच्या लहान सहान कर्मामधून मिळालेली होती. दरिद्री, पतीत ,दलित व्यक्तींच्या हृदयाशी आपले हृदय एकरूप करून त्यांच्या दुःखाचा, दैन्याचा, त्यांच्या वेदनेचा सहानुभव कशा तऱ्हेने करून घ्यायचा असतो हे कितीतरी प्रसंगी स्वामीजींच्या जीवनात त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते.”
एक प्रसंग या साधूंच्या मनावर अगदी कोरला गेला होता.’जीवनोद्देश आणि समाजाभिमुखता’ म्हणजे नेमके काय हे स्वामीजींनी सहज कृतीतून दाखवून दिले. मठात काम करणाऱ्या संथाळ जातीच्या मजुरांना पुऱ्या,भाजी ,मिठाई ,दही स्वतः स्वामीजींनी तयार करून वाढले. ही पंगत वाढल्यानंतर ती मजूर बायामाणसे विश्रांती घ्यायला गेल्यावर स्वामीजी शिष्यांना म्हणाले,” बघितले जणू साक्षात नारायण! किती सरळ मनाचे आहेत. असे निष्कपट अकृत्रिम प्रेम कुठे पाहायला मिळेल? यांचे थोडे तरी दुःख दूर करू शकाल का? नाहीतर भगवे कपडे घालून आपण काय मिळवले? परहितासाठी सर्वस्वाचे समर्पण याचेच नाव खरा संन्यास. यांना चांगल्या गोष्टींचा कधी भोग घ्यायला मिळाला नाही. या देशातल्या लोकांना दोनवेळा खायला मिळत नाही. आपण कोणत्या तोंडाने घास गिळायचे ?स्वतःच्या मुक्तीसाठी धडपड करणे फेकून द्या आणि सगळे मिळून खेडोपाडी फिरून आपल्या शीलाच्या आणि साधनेच्या बळावर श्रीमंत लोकांना आपले म्हणणे पटवून देऊ आणि दरिद्री नारायणाची सेवा करीत आयुष्य घालवू. इतका निढळाचा घाम गाळूनही दोन वेळा पोटभर अन्नाची आणि अंगभर कपड्याची यांना मारामार. अहोरात्र हाडांची काडेकरूनही ते आपल्या अन्नपाण्याची आणि कपडालत्त्यांची ददात मिटवू शकत नाहीत.त्यांच्यासाठी काम करणे हीच खरी त्या जगदंबेची उपासना.”
पंडित दीनदयाळ उपाध्याय हेच वेगळ्या पद्धतीने सांगतात,ते म्हणतात,”मानवीय जीवनातील श्रेष्ठ गुणांची आराधना भारतीयत्वाची विशेषता आहे. सृष्टिच्या प्रत्येक अंगात एकता आहे.एकच तत्व भिन्न भिन्न रूप घेऊन प्रकट होत असते,यावर आमचा विश्वास आहे. या भिन्नतांमध्ये जो एक आत्मा बघू शकतो, तो श्रेष्ठ आहे आणि अशा श्रेष्ठ मनुष्यांच्या निर्मितीची जी व्यवस्था आहे तिला आम्ही धर्म म्हणतो.”
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या आझाद हिंद सेनेचे प्रेरणादायी गीत ठरवले होते,
कदम कदम बढाए जा
खुषी के गीत गाये जा
ये जिंदगी है कौम की
तू कौम पे लुटाये जा..
आपल्या वंशाचे,समाजाचे आपण देणे लागतो.या सृष्टीचे आपण देणेकरी आहोत.आपल्या भूमीचे,संस्कृतीचे आपण ऋणाईत आहोत हा भाव या गीतातून प्रकट होतो.
समाजासाठीच ज्यांनी आपल्या जीवनाला समर्पित केले त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या उल्लेखाशिवाय समाजाभिमुखतेच्या बाबतीतला लेख पूर्ण होऊ शकत नाही.
बाबासाहेब स्वतःला आपल्या अस्पृश्य बांधवांची आई म्हणवून घेत. एकदा जमनालाल बजाज आणि शेठ वालचंद हिराचंद हे दोघे लक्षाधीश बाबासाहेबांना म्हणाले ,”बाबासाहेब आम्ही अस्पृश्यांसाठी इतके काही करतो ,अमाप पैसा खर्च करतो,परंतु ते तुमच्यावरच अतोनात प्रेम करतात.हे असे का घडते?” तेव्हा बाबासाहेब म्हणाले,” आई आणि दाई यात जो फरक असतो,तोच फरक माझ्या आणि तुमच्या करण्यामध्ये आहे.”
त्यांच्या तत्त्वचिंतनाही सातत्याने हाच भाव प्रकट होतांना दिसतो.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्देश दलितांचा उद्धार हाच होता.बंगल्यात रहायला लागल्यावर बाबासाहेब आठवड्यात एकदा कांदा,चटणी, भाकरी खात असत.रात्र रात्र त्यांना आपल्या बांधवांच्या दिनवाण्या स्थितीमुळे झोप येत नसे.समाजातील बांधवांकडे मातृभावाने बघणारे बाबासाहेब जीवनोद्देशाशी कुणी किती एकरूप होऊ शकतो याचे उदात्त उदाहरण आहेत.
आपला जीवनोद्देश स्पष्ट असेल तर ज्याच्याकडून कर्ज घेतले त्याच्याकडून पुन्हा पैसे घेऊन तेच कर्ज फेडण्याची गंमतही घडू शकते! विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आयुष्यात घडलेली ही गमतीशीर घटना. विठ्ठल रामजी शिंदे यांना सयाजीराव यांनी शिक्षणासाठी दीड हजार रुपयांचे कर्ज दिले होते. त्यातून ते विदेशात जाऊन शिकून आले आणि त्यानंतर ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना बडोद्याच्या संस्थानात नोकरी करण्याची अट घालण्यात आलेली होती. याच दरम्यान त्यांना मँचेस्टर येथील शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तेथे जाण्यासाठी त्यांना आणखी दीड हजार रुपयांची आवश्यकता होती.तेव्हा त्यांनी सयाजीरावांना मला तेथे जाण्यासाठी दीड हजार रुपये द्या।आल्यानंतर मी संपूर्ण आयुष्य समाजासाठीच वेचेन आणि त्यातूनच तुमचे कर्ज फीटले असे समजा, असे सांगितले. सयाजीरावांनीही मोठ्या मनाने दीड हजार रुपये देऊन आधीचे कर्ज फिटले,असे हसत हसत सांगितले. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पत्नीने मंगळसूत्र गहाण ठेवले.त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली.सगळे आयुष्य दलित,वंचित,दरिद्री लोकांच्या सेवेत वेचले.
भारतीय विद्यार्थी जगाच्या बरोबरीने चालावेत,आणि त्याच वेळी त्यांना आपल्या देशाच्या परंपरांची जाण असावी या हेतूने बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना करणाऱ्या पं.मदन मोहन मालवीय यांच्या जीवनातील एक घटना समाजाभिमुखतेच्या वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकते.स्वातंत्र्याच्या आंदोलन काळात चौरिचुरा येथे हिंसाचार घडला,आणि महात्माजींनी आंदोलन मागे घेतले.मात्र इंग्रजांनी धरपकड करून तब्बल १७० सत्याग्रहींना फाशीची शिक्षा सुनावली. महामना मालवियांना हे कळाल्याबरोबर त्यांनी त्या सर्वच्या सर्व सत्याग्रहींचे वकीलपत्र घेतले. आपले सर्व ज्ञान,परिश्रम पणाला लावून त्यातील १५१ जणांची फाशीची शिक्षा त्यांनी रद्द करवली.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या काव्यपंक्ती येथे अगदी चपखल बसतात,
गुणसूमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा व्हावे..
आपली वकिलीचा विद्या पणाला लावून महामना मालवियांनी समाजाभिमुखता म्हणजे काय असते,मनुष्यऋण कसे फेडायचे याचा आदर्श उभा केला.
आपल्या भारतीय संस्कृतीत सगळीकडे ही ऋण फेडण्याची परंपरा आहे.
जैन व बौद्ध पंथात दानाचे अपार महत्व आहे.शीख पंथात लंगर चालवले जातात,त्यामागे मी या भूमीत पिकणारे अन्न सेवन करून निवांत झोपण्यापूर्वी या भूमीवर तितकाच अधिकार असलेल्या माझ्या भुकेजल्या बांधवांना खायला घालण्याची व्यवस्था करेन ही भूमिका आहे.ह्या मधून समाजाभिमुखता दिसते.
भारतात इंग्रज येण्यापूर्वी पर्यंत समाजाचे देणे हे व्यक्तीगत संस्कारांच्या स्वरूपात होते.मात्र नवप्रबोधनाच्या काळात, गेल्या दोन शतकात तिचे स्वरूप संस्थात्मक झाले आहे. ह्या दरम्यान ऋणांची कल्पना विस्मृतीत गेली. सामजिक काम करणे म्हणजे कुणावर ‘उपकार’ करत आहोत असे वाटून अहंकार बळावू लागला. संस्था चालवणारे संस्थानिक होऊ बघत आहेत.आपण जणू समोरच्यावर उपकार करीत आहोत व लाभार्थी हा हलक्या दर्जाचा आहे,अशी हीन भावना मूळ धरत आहे.अर्थात यात सन्माननीय अपवाद आहेतच परंतु अधिकतर ठिकाणी हा अहंभाव दिसून येतो.
संस्थात्मक पातळीवर जशी मूळ मानवीय उद्दिष्टाशी फारकत घेतलेली असते,तशीच स्थिती काहींच्या आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर दिसून येते.हे लोक शिक्षणासाठी परिश्रम करतात,आपली उन्नती व्हावी म्हणून अक्षरशः भौतिक साधना करतात.कठोर परिश्रमाने इतरांहून वेगळे असे ‘व्यक्तित्व’ निर्माण करतात.मात्र बरेचदा ते त्यांचे स्वाभाविक प्रकटीकरण नसते.त्यामुळे ते कृत्रिम व्यक्तित्व सतत सांभाळत बसावे लागते,अंत:प्रज्ञेशी सतत झगडावे लागते,किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करावे लागते.हा खरा जीवनोद्देश नसतोच.अशी कृत्रिम उन्नती माणसाला अस्वस्थता देते!स्वतःच्या जीवनातील व्याप सांभाळणे हेच त्यांचे काम होऊन बसते.समाज,सृष्टी या सगळ्यांकडे पहाण्यासाठीचा अवकाशच त्यांना मिळत नाही.अश्या कर्तृत्वभावाचे निराकरण केवळ ऋणांच्या जाणीवेतूनच होऊ शकते.
मनुष्याचा जन्म हा केवळ पृथ्वीवरील एका प्राण्याचा जन्म असत नाही.तो कोणत्या ना कोणत्या समाजाचा, संस्कृतीचा, धर्माचा प्रतिनिधी असतो. एवढेच नाही तर तो संपूर्ण मानवतेचा देखील प्रतिनिधी असतो. मनुष्याचे जीवन जरी लहान काळाचे असले तरी तो भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या दोऱ्याने बांधलेला असतो.त्यामुळे त्या प्रदीर्घ धारेचा तो एक भाग असतो आणि त्या अर्थाने तो संकीर्ण राहत नाही तर एका मोठ्या अस्तित्वाचा अंश म्हणून जीवन जगत असतो.पृथ्वीवरील इतर प्राणी आणि मनुष्यामध्ये मूळ अंतर आहे ते स्मृती आणि भावनांच्या उपस्थितीचे! भाषा आणि प्रकटीकरणाच्या उपलब्धीचे!त्यामुळे मनुष्यजीवन पूर्णतः भिन्न उंचीचे असते! अशा मनुष्याच्या जीवनामध्ये समाज जीवनाचा प्रवेश जेव्हा होतो तेव्हा स्वविकासाच्या सोबत मानवी प्रश्नांचे भांडार देखील वाढत जाते.भाषा,कला,धार्मिक संकल्पना, संस्कृती ,कृषीतंत्र, भौतिक सुविधा हे आयाम मनुष्याच्या जीवनामध्ये येतात.साधन संपत्ती, घर -जमिनीची मालकी, नातीगोती, रीती रिवाज, रूढी परंपरा, ग्रामीण आणि नागरी जीवन हे सर्वच मानवी जीवनाचे भाग होऊन बसतात.व्यक्तीसोबतच समष्टीचे एक स्वतंत्र मन तयार होते.व्यक्ती आणि समाजाचा बंध मानवी आयुष्याचे अविभाज्य अंग आहे.आपल्या जीवनात समाजाभिमुखता असली पाहिजे तरच माणूस म्हणून आपण सार्थक जीवन जगलो असे म्हणता येईल.
‘मामका पांडवाश्चैव’ म्हणणारा धृतराष्ट्र आणि ‘वयं पंचाधिकं शतम्’ म्हणणारा युधिष्ठिर, दोघेही द्वैताची भाषा करीत होते.धृतराष्ट्र स्वतःला आपल्या पुत्रांशी जोडून ममता आणि अहंकाराची निर्मिती करीत होता.तेच युधिष्ठिर स्वतःला कर्तव्याशी जोडून आपुलकी, ऐक्याचा विचार करीत होता.एकाचे जीवन वनातील वणव्यात जळून खाक झाले,तर दुसरा शांतपणे स्वर्गात पोहोचला!एकाला जीवनभर सिहासन प्राप्त झाले तरीही सुख समाधान शांती मिळाली नाही तर दुसऱ्याला वनवासात रहावे लागले,अज्ञातवास पत्करावा लागला,कष्ट करावे लागले तरीही जीवनात समाधान,शांती लाभली.स्वतःपुरते न पाहण्याचे असे महत्व आहे.
अनेकदा मनुष्याचे जीवन पारिवारिक आणि सामाजिक समस्यांनी वेढलेले असते.स्वतः मनुष्याला अपूर्णतेचा,नियतीच्या आधीन असण्याचा ताण असतो.या अमर्याद समस्यांवर स्वतःच्या पलीकडे पहाणे हाच उपाय आहे.यालाच समाजाभिमुखता असे म्हणता येईल!आपल्या जीवनातील उत्तमाला धारण करतांना सृष्टी व समष्टी हे ही माझेच भाग आहेत,त्यांच्यासाठी व्यक्तिगत सुखाचा थोडा त्याग करणे हे मनुष्य म्हणून माझे कर्तव्य आहे.हे जाणून जगलेले जीवन सफल मानवी जीवन आहे.माखनलाल चतुर्वेदींची कविता,’ पुष्प की अभिलाषा’ हेच सांगू पहाते.फुल म्हणते ,
चाह नहीं मैं सुरबाला के
गहनो में गुंथा जाऊं।
चाह नहीं प्रेमी माला में
बिंध प्यारी को ललचाऊं।
मुझे तोड लेना बनमाली
उस पथपर देना तुम फेंक।
मातृभूमी पर शिश चढाने
जिस पथपर जावें वीर अनेक।