साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीय विचार
भारत जेंव्हा पारतंत्र्याच्या तिमीरातून स्वातंत्र्याच्या प्रकाशात येण्यासाठी संघर्षरत होता, त्या धामधुमीच्या काळात अण्णाभाऊंचा जन्म झाला. स्वातंत्र्याच्या चर्चा झडत होत्या, लढे उभारले जात होते, राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग जनमानसात पेटत होतं. पण या सगळ्यांपासून दूर; रोजचं जगणं हाच मुळी ज्यांच्यासाठी एक मोठा संघर्ष होता अशा समाजघटकांतून अण्णाभाऊ आलेले. सामाजिक विषमता, शिक्षण- उपजीविका- सामाजिक सन्मान आणि अन्य मूलभूत मानवी अधिकारांपासून वंचित असणं. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची लेखणी तळपली. तत्कालीन परिस्थिती आणि अण्णाभाऊंचा सततचा जीवनसंघर्ष लक्षात घेतला तर अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं साहित्यविश्व; त्यांचं शब्दसामर्थ्य केवळ स्तिमित करून टाकणारं आहे.
पदोपदी पराकोटीची सामाजिक उपेक्षा, अन्याय, दारिद्र्य यांना तोंड देत जेंव्हा एखादी व्यक्ती पुढे येते, स्वकर्तृत्वावर आपलं साम्राज्य उभं करते त्यावेळी स्वाभाविकपणे जो समाज, ज्या परंपरा त्याच्या उपेक्षांना, अन्यायाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरल्या त्यांच्याविषयी तिरस्कार आणि कटुता प्रगट होते. त्यांचा लवकरात लवकर त्याग करून त्यापासून स्वत:ला मुक्त करून घेण्याचा ध्यास व्यक्त होतो. अनेक साहित्यिक मंडळींच्या साहित्यातून असा ध्यास प्रगट होताना आपण पाहतो. या अन्याय- विषमतेची मूळ कारण अर्थातच इथल्या धर्म आणि समाजव्यवस्था विकृत अव्यवस्था झाल्या, त्यात सापडतात. अनेकांनी, त्यामुळं इथल्या सगळ्या परांपराच मुळातून नाकारल्या. जुना इतिहास पूर्णपणे त्याज्य समजून टाकून दिल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही ही मांडणी करत इथल्या परंपरांवर, इतिहासावर कठोर प्रहार केले. इथे आपल्याला अण्णाभाऊंचे वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसते. केवळ नकार आणि विद्रोह इथेच न थांबता नवा समाज घडवण्याची आस अण्णाभाऊंना लागलेली आहे. त्यासाठी त्यांची लेखणी झटते आहे. असा नवा समाज घडविण्याचा त्यांचा मार्ग मात्र ‘जुने जाउद्या मरणालागून..’ असा सरसकट नकाराचा नाही. त्यांना इथला ‘माणूस’ घडविण्याचे, त्यातून हा देश समृद्ध व सुजाण करण्याचे स्वप्न पडले आहे. म्हणून परंपरांतून जे वाईट ते टाकून देण्याबरोबरच जे चांगलं- समाज उभा करणारं आहे, ते संस्कृतीतून स्वीकारत पुढे जाण्याचा अधिक संतुलित मार्ग अण्णाभाऊंनी स्वीकारलेला आहे. अर्थातच त्यांनी त्याची प्रेरणा कुठून घेतली आहे, हे ही स्पष्ट केलेले आहे. “जग बदल घालूनी घाव- गेले सांगून मज भीमराव..’ ही ती प्रेरणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची ही परंपराच अण्णाभाऊ पुढे चालवताना दिसतात. त्यात अन्यायाचा पेटून उठून विरोध तर आहेच पण सुधारणाही आहे. द्वेष अन संकुचिततेला इथे थारा नाही, यात सर्वसमावेशकता आहे. ‘बंधुतेवर’ आधारित ‘स्वातंत्र्य आणि समता’ आणण्याचा- परिवर्तनाचा ध्यास आहे. ‘भारतीय भूमीचा इतिहास म्हणजे केवळ सामाजिक अन्यायाचा इतिहास’ अशी एकांगी मांडणी करत इतिहास संपूर्णत: नाकारणारे साहित्यिक आपण पाहतो. विशेषत: अण्णाभाऊंनी त्यांची उमेदीची वर्षे ज्या डाव्या- कम्युनिस्ट चळवळीत व्यतित केली, त्यातील अनेक बुद्धिवंत ‘देश’, ‘संस्कृती’ अथवा ‘इतिहास’ याबद्दल अभिमान न बाळगता त्यांना सरसकट ‘बुर्झ्वा’, प्रतिगामी ठरवून, नाकारून; आणि सततच्या ‘वर्ग- कलहातून’ नवा समाज घडेल अशी अपेक्षा बाळगतात. त्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ या मातीला, इथल्या माणुसकीला आणि चांगुलपणाला कधी नाकारत नाहीत, हे त्यांचे वैशिष्ट्य!
“आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नंदी आमच्याच जीवनसंघर्षाने झडली आहे. जेंव्हा दलितांची सावली असह्य होती तेंव्हा महानुभावपंथीय साहित्यिकांनी, सर्वांना ज्ञान मिळाले पाहिजे, ज्ञान हे मोक्ष असे समजून बंड केले. ते आमचे साहित्यिक. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे असा दावा मांडून ज्यांनी दलितांच्या भाषेत महाराष्ट्राला सुंदर ज्ञानेश्वरी दिली ते आमचे साहित्यिक आणि चुकलेले महाराचे मूल कडेवर घेऊन जाणारे ते एकनाथ, ते आमचे साहित्यिक. जो दलिताला कडेवर घेतो, त्याला तो जिभेवर घेतो आणि त्याला जो विद्रूप करतो, त्याला दलित विद्रूप करतो अशी इतिहासाची साक्ष आहे”.
अशा निसंदिग्ध शब्दांत अण्णाभाऊंनी आपला दृष्टीकोन मांडला आहे.
अण्णाभाऊंचं अख्खं आयुष्य उपेक्षेत, हाल-अपेष्टांत गेलं. पण त्याबद्दल त्यांनी कधीही देशाला, समाजाला आक्रस्ताळेपणा करीत दोष दिलेला नाही, किंवा त्याबद्दल सूड उगवण्याची भावनाही कधी कुठे व्यक्त केलेली नाही. आयुष्यात एव्हढे अन्याय उपेक्षा ज्याला सहन करावी लागते त्यांच्यापैकी अनेक जण हाती बंदूक घेतात हे ही आपण पाहीले आहे. अण्णाभाऊंनी त्याऐवजी लेखणी उचललीय. कारण त्यांना विध्वंस नाही तर मांगल्याचा ध्यास लागलेला आहे!
त्यांना माणसांची, त्यातील माणुसकी शोधण्याची आवड आहे. म्हणून अन्याय करणार्या समूहामधील देखील माणुसकी त्यांना साहित्यातून अचूकपणे शोधता येते. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे अण्णाभाऊंविषयी लिहितात- अण्णाभाऊंचं आपल्या मायभूमीवर तसेच देशावर अत्यंत श्रद्धा, प्रेम होतं. आणि ते त्यांनी आपल्या वगनाट्यातून तर प्रगट केलेले आहेच;परंतु अलगुज या त्यांच्या साहित्य ग्रंथाचं प्रकाशन चालू असताना ते आजारी पडले. त्यांची अवस्था बिकट झालेली होती. त्यावेळी आपल्या प्रस्तावनेत त्यांनी ते लिहिलं आहे. “माझं अलगुज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घुमेल त्या स्वरांच्या आस्वादानं माझा रसिक, सुज्ञ आणि जाणकार वाचक आशीर्वाद देईल आणि माझे प्राण वाचतील. अलगुजाचा रव असाच घुमत राहील. माझा देश प्रेमळ आहे.; मायाळू आहे”. अण्णाभाऊंची श्रद्धा आपल्या देशावर, या मायभूमीवर होती तितकीच या देशातील कनवाळू माणसांवर होती. समीक्षक आणि अण्णाभाऊंचे अभ्यासक डॉ. राजकुमार म्हस्के यांनी अण्णाभाऊंचे हेच वैशिष्ट्य नेमकेपणाने मांडले आहे. “या मातीचे, समाजाचे भले सगळे मिळून करुयात. ही त्यांच्या मनाची तळमळ आहे. जो- जो शोषित, जो- जो पिडीत तो- तो दलित अशी त्यांची भूमिका होती. सर्व जाती- जमातींच्या दलितांच्या शोषितांच्या बाजूने उभे राहणार्या नायकांची त्यांनी निर्मिती केली. विष्णुपंत कुलकर्णी, सत्तू भोसले, मास्तर ही त्यांचीच रुपे आहेत. स्वत:पेक्षा इतरांसाठी, समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी झटणारी माणसे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात ठायी ठायी उभी केलेली आहेत”
राष्ट्र म्हणजे कांही केवळ जमिनीचा तुकडा नव्हे. तर त्या भूमीतील हाडामांसाच्या माणसांचे परस्परांशी असलेले स्नेहभावयुक्त सहजीवन हा राष्ट्रभावनेचा आधार असतो. बंधुत्वाच्या नात्याने एकमेकांशी बांधले गेलेले व्यक्तिसमूह सतत उत्कर्षशील असणे- म्हणजेच अण्णाभाऊंच्या शब्दांत ‘मांगल्य’ असलेले राष्ट्र बनणे हे राष्ट्रवादाचे अंतिम उद्दिष्ट्य! अण्णाभाऊंचे सर्वच साहित्य समाज निर्दोष बनवण्याच्या भावनेने भारलेले म्हणजेच राष्ट्रवादाचा सामाजिक आशय प्रखरतेने मांडणारे आहे.
आपल्या लिखाणाची प्रेरणा सांगताना अण्णाभाऊ म्हणतात, “मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणार्या वास्तव जगाच्या बंधनांतून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जगाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार करून देणे हे वाङ्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारकच असते. म्हणूनही वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करूया आणि आपल्या लेखण्या दलितांच्या चरणी अर्पूया.”
अण्णाभाऊंची वाङ्मयसंपदा अत्यंत विपुल आहे. केवळ ‘दीड दिवस’ शाळेत गेलेल्या या महान सारस्वताने जीवनाचं अख्खं विद्यापीठच आपल्या साहित्यातून उभं केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेतून 35 कादंबर्या, 14 लोकनाट्ये, 3 नाटकं, 13 कथासंग्रह, 1 प्रवासवर्णन आणि महाराष्ट्रभर अत्यंत गाजलेले दहाहून अधिक पोवाडे असा साहित्यसंभार निर्माण केला. त्यांच्या साहित्यातील बहुतांश पात्रे देखील कष्टाळू, साधे, क्वचित प्रसंगी सोशिक परंतु पारंपरिक नीतीमूल्यांना धरून राहणारी आहेत. अन्यायाच्या विरुद्ध खवळून उठणार्या अण्णाभाऊंच्या नायक- नायिका कल्पनेतील नाहीत तर वास्तवातील, अस्सल मातीतील आहेत. येथील मातीचे विशेषत: ग्रामीण भागातील कुटुंबांत गेल्या पिढीपर्यन्त अगदी ठसठशीतपणे दिसणारे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. ही सरळ- साधी माणसं, त्यांचं सामाजिक विषमता, प्रतिकूल परिस्थिती, गरीबी आणि राज्यव्यवस्थेकडून होणारा अन्याय यांच्याशी झगडत जगणं अण्णाभाऊ कमालीच्या अचूकतेने आपल्यासमोर ठेवतात. सामान्यांतील असामान्य असणारी अण्णाभाऊंची ही पात्रं जगण्याचं एक ध्येय ठेवून असतात. ‘फकिरा’ कादंबरीतील बहुतांश पात्रे अशीच. त्यातील मांगवाडा आणि विष्णुपंत कुलकर्णी यांचं नातं ही इथल्या मातीच्या खर्या संस्कारांची शिदोरी. जागोजागी अशा शिदोर्या अण्णाभाऊ आपल्या वाचकांसमोर ठेवतात. ‘माकडीचा माळ’ मधले भटके, ‘वारणेचा वाघ’ मधील सत्तू आणि अशी असंख्य उदाहरणे! त्यांचे साहित्य ‘कलेसाठी कला’ किंवा ‘रंजनवादा’ पुरते मर्यादित कधीच नव्हते. तसेच ते प्रचारकी थाटाचे देखील वाटत नाही. त्यातील अस्सल मातीचा सुगंध मात्र खिळवून ठेवतो, परिवर्तनाच्या दृष्टीने निश्चित विचार करायला लावतो ही त्यांची ताकद आहे. स्वत: अण्णाभाऊंची याबद्दलची भूमिका अशी आहे की. “मला कल्पनेचे पंख लावून भरारी घेता येत नाही. मी जे जगलो, जे पाहिले आणि अनुभवले तेच मी लिहिले”
अण्णाभाऊंचे अभ्यासक प्रा. अंबादास सगट यांच्या मते “अण्णाभाऊंच्या साहित्यातून चित्रित झालेल्या मातंग या समाज घटकाचा विचार करीत असताना असे लक्षात येते की, या समाजाला शौर्याची एक परंपरा आहे. अत्यंत लढाऊ, बाणेदार आणि इमानदार असा हा समाज आहे. मायभूमीवर अपार प्रेम करणार्या या समाजाच्या नसानसात राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा भरलेली आहे. त्याने या मातीशी जोडलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. ती सतत जोडून ठेवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासही मागे-पुढे पहिले नाही. गावाच्या, प्रदेशाच्या आणि देशाच्या भल्यासाठी स्वत:च्या हिताची, सुखाची आहुती देणारा मातंग समाज गावाला आणि देशाला अभिमानास्पद वाटतो” अण्णाभाऊंनी प्रत्येक घटकांतील असे आदर्श दाखवून आदर्श समाज निर्मितीला आवश्यक मनोधारणा कशा असाव्यात याचे वस्तूपाठ घालून दिले आहेत. त्यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘फकिरा’ मधील नायक फकिरा जुलमी इंग्रजी सत्तेबद्दल म्हणतो, “ह्ये कुंभकरणाच्या अवलादीचं राज हाय. आपुन तलवार घेऊनच यांच्या उरावर नाचलं पायजे” त्यांच्या कथेतील माणसं ‘आता स्वराज्याच्या भानगडीत हाय’ असं एकमेकांना सांगतात!
“मरण तर माणसाच्या पाचवीलाच पूजलेलं हाय. पण माणसानं चांगल्या कामी मरावं. हे गाव, ही नदी, ही शेतं, ही जमीन हे सारं जगणार आहे आणि या सार्यांसाठी आपल्याला मरण येणार असेल तर आपली पुन्हा भेट होणार नाही” अण्णाभाऊंच्या कथेतील ‘सावळ्या’ सारखा उपेक्षित घटकांतील तरुण देखील जीवनाचं मोठं तत्वज्ञान सहजपणे सांगून जातो!
भटक्या विमुक्त समाजातील घोर अज्ञान, अंधश्रद्धा, कुप्रथा याविरुद्ध बंद करणारा ‘बरबाद्या कंजारी’. अण्णाभाऊंची एक प्रभावी कथा. या सगळ्या कुप्रथांना विरोध केल्यामुळं जातपंचायत बरबादयाचे कान कापण्याची रानटी शिक्षा देते. कान कापला जाऊदे, पण समाज सुधारेल या सद्भावनेपोटी निडर बरबाद्या ही शिक्षा भोगायलाही तयार होतो. उदात्त ध्येयासाठी, उद्याच्या चांगल्या नव- समाजासाठी त्याग करणारी ही सामान्य माणसं आण्णाभाऊंच्या वाङ्मयात आपल्याला सगळीकडे आढळतात.
अण्णाभाऊंच्या साहित्याचे अभ्यासक व लेखक रवी गोळे म्हणतात, “अण्णाभाऊंनी लिहिलेले भटक्यांचे जीवन हे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनातून साकारलेली कलाकृती आहे. अण्णाभाऊ साम्यवादी विचाराचे असले तरी त्याचा या लिखाणाशी संबंध लावणे योग्य होणार नाही कारण अण्णाभाऊ साठे हे सामाजिक बांधिलकी मानणारे साहित्यिक आहेत. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रचंड शस्त्र आहे, अशी त्यांची स्वच्छ भूमिका आहे. ही धारणा त्यांना कम्युनिस्ट चळवळीच्या सहभागातून मिळाली नाही तर साहित्याच्या अंगभूत सामर्थ्याच्या जाणिवेनेच ती त्यांना मिळवून दिली आहे. अण्णाभाऊ हे साहित्य जगणारे जीवनाचे पाईक व जीवन लिहिणारे जातिवंत साहित्यिक होते!”
अण्णाभाऊंची शाहीरी आणि पोवाडे यातून तर त्यांचे देशप्रेम ओतप्रोत दिसते. जातीय दंगली थांबविण्याचे आवाहन करताना ते कळवळून सांगतात-
“भारतियांनो इभ्रत तुमची इर्षेला पडली|
काढा बाहेर नौका नेहरूची वादळात पडली|
धरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली|
काढा बाहेर राष्ट्र नौका ही वादळात शिरली|”
महाराष्ट्राची थोरवी सांगणारा त्यांचा पोवाडा तर अत्यंत गाजलेला आहे.
“महाराष्ट्र देशा, आमुच्या महाराष्ट्र देशा |
आनंदवनभुवन तू भूवरी भूषवी भारतवर्षा ||
..चिरायु हो महाराष्ट्र अमुचा, एकाच अभिलाषा||”
राष्ट्रवाद म्हणजे केवळ स्वातंत्र्यासाठी लढणे एव्हढेच नव्हे. ते तर आहेच, पण इथला समाज निर्दोष व्हावा, संपन्न आणि सुखी व्हावा; इथल्या प्रत्येक घटकाला, विशेषत: उपेक्षितांना बंधुभावनेच्या आधारावर, भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीची समान संधी प्राप्त व्हावी यासाठी तन- मन- धन अर्पण करून झटणे देखील त्यात आलेच! असा समाज निर्माण व्हावा असा ‘मांगल्याचा ध्यास’ आपल्या समग्र साहित्यातून घेतलेला अण्णाभाऊंसारखा तेजस्वी साहित्यकार शतकातून एखादाच!